आणि धारकरी देवासारखे धाऊन आले

श्री शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर गड उतरताना पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात लोकांना गड उतरण्यास मदत करण्यासाठी सर्वच धारकरी व शिवभक्त प्रयत्न करत होते. मी आणि दीपकराव खामकर सर्व मदत कार्य संपल्यानंतर गड उतरण्याचा निर्णय घेतला. महादरवाजातुन एक पोलिसांची तुकडी म्हणत आली की सर्व गड आता रिकामा आहे आणि सर्व पोलिसांना खाली उतरण्याचे आदेश दिले. उतरण्याच्या तयारीत असताना एक भाऊ बहिण अगदी चिंतीत अवस्थेत दिसले. विचारपूस केल्यानंतर समजले की पाऊस आणि थंडी सहन न झाल्याने तीला सारखी चक्कर येत आहे आणि यामुळे आम्ही दोघच सर्वात मागे अडकलोय… तीला धीर देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो पण काहीच प्रतिक्रिया ती देत नव्हती. चालण्याच्यासुद्धा अवस्थेत नव्हती. तीचा भाऊ तर अगदी रडकुंडीला आला होता. आता कसं करायचं गड कसा उतरायचा आणि डॉक्टरकडे कधी घेउन जायचं.
शेवटी मी आणि दीपकरावांनी तीला आळीपाळीने खांद्यावर उचलुन गड उतरण्याचा निर्णय घेतला. कारण त्या एकट्या भावाला तीला उचलुन खाली नेणे अशक्य होते.. काही वेळ तीला दीपकरावांनी एकट्याने तीला उचलुन खाली आणण्याचा प्रयत्न केला … परंतु दोन दिवस रायगडावर आम्ही देखीला पावसाचा मारा सोसत होतो आणि त्यात अपुऱ्या झोपेमुळे आम्हीसुद्धा थकलो होतो. मग माझ्या जवळची चादर गुंडाळुन त्यात तीला ठेउन, झोळीसारखं करुन उतरवण्याचा निर्णय घेतला. सोबत आणखी दोन शिवभक्त आले … काहीकाळ उतरल्यानंतर लक्षात आलं की ताईची काहीच हालचाल नाही. तीला एका बाजुला ठेउन उठवायचा प्रयत्न केला … त्यात काही पोलिसांनी हे पाहिले आणि सांगितले की हाता पायाचे तळवे जोर जोरात चोळा. पोलिससुद्धा मदतीला आले. ताई शुद्धीवर आली … परत झोळीत टाकुन पटापट खाली उतरवण्याचा प्रयत्न करु लागलो .. वाळसुरे खिंड येई पर्यंत दोन तीन वेळा ती बेशुद्धावस्थेत गेली परंतु पुन्हा आम्ही तीला खाली ठेउन हाता पायाचे तळवे चोळुन, तीला धीर देउन जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.. कारण पोलिसांनी सांगितले होते की तीला कसही करुन जागे ठेवा बेशुद्धावस्थेत जाऊ देउ नका..
शेवटी वाळसुरे खिंडीपर्यंत आलो आणि आता शेवटची २० ते २५ मिनिटे उरली असताना तीला दातखिळी बसली … सर्वांचेच चेहरे चिंतीत झाले. आता काय करायचं? दीपकरावांनी सांगितलं कांदा किंवा बुटाचा सॉक्स नाकावर लावावा लागेल .. पण कोणाच्याही पायात बुट नाहित नी कांदा जवळ असण्याचा प्रशनच नाही. परंतु ताईला अशा ठीकाणी दातखिळी बसली जिथे जवळच चहा नाश्त्याची टपरी होती. लगेचच कांदा घेउन तो फोडुन तिच्या नाकाजवळ धरुन तिला शुद्ध केलं. आता काही करुन लवकर तीला खाली उतरवायचे गरजेचे झाले होते… शिवाय झोळीत ठेवल्यावर ती धी भेशुद्धावस्थेत जाईल हे सांगता येत नव्हते म्हणून झोळीत न ठेवता हातांनी उचलुनच घेउन जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय खरच सार्थ ठरला कारण खिंडीपासून चित दरवाजापर्यंत तीला तीनदा दातखिळी बसली व तीनदा ती दातखीळ सोडवण्यास यश आले… शेवटी खाली उतरल्यानंतर पोलिसांच्या गाडीत ठेउन पुढील उपचारासाठी नेण्यात आले..
सर्व गड रिकामा झाला होता … सर्वात शेवटी आम्ही होतो. कसं काय आम्हाला ते दृश्य दिसलं आणि मदतीला जायचा निर्णय आम्ही घेतला कारण त्यांच्या येण्यात आणि आमच्या निघण्यात दोन सेकंदांचा जर फरक पडला असता तर तीला मदत मिळणं अशक्य होतंब… आणि जर आम्हाला ते दोघं दिसले नसते तर आमच्या मागुन उतरणारे कोणीच नव्हते. एकट्या भावाने काय केलं असतं कोणास ठाऊक?
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

असे आपले धारकरी…🐅🐅

वेंगळूरला साकरतेय भारतीय युद्धकलेचे गुरुकुल

नमस्कार….
एक वर्षांपूर्वी सर्वांच्या आशीर्वादाने आणि श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाने सव्यसाचि_गुरुकुलम् निर्माणाचा संकल्प सोडला आणि त्यातील प्राथमिक टप्पा मल्लविद्या_मंदिर साकार झाले.
आपले सर्व कार्यकर्ते, गुरुबंधू, गुरुजी आणि सर्व विद्यार्थी यांच्या समर्पणातून, आशीर्वादातून तसेच आर्थिक सहकार्यातून आणि श्री गुरुजींची असलेली कृपा केवळ याचमुळे हे कार्य पूर्ण झाले आता पुढच्या टप्प्याची सुरुवात…

आपले आशीर्वाद आणि सहकार्य असेच राहुद्या…हीच आपल्या चरणी प्रार्थना..

याची दखल तरुण_भारत ने घेतली आणि वार्ताहर युवराज भित्तम यांनी स्वतः येऊन माहिती घेऊन बातमी प्रसिद्ध केली याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.

आपल्या सर्वांना अगत्याचे आमंत्रण आपण सर्वांनी यावे आणि आम्हा सर्वांना जरूर ते मार्गदर्शन करावे.

शस्त्रविद्येच्या अभ्यासासाठी आणि प्रशिक्षण यासाठी सदैव तत्पर आपण सगळ्यांनी अवश्य यावे.

– लखन जाधव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ठिकाण:- सव्यसाचि गुरुकुलम्
मु/पो. वेंगरुळ, ता.- भुदरगड, जि.- कोल्हापूर.
संपर्क:- लखन जाधव
09623851285/08055556005.

 

शिवदिनविशेष : १६ जून

१६ जून १६५९ : विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी राजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकरर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदरांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येउन मिळण्यास सांगितले.

१६ जून १६७० : माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली – भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.

“शिवचरित्र” – 1 लाख डाऊनलोड्स.

आजपासून बरोबर सहा महिन्यांपूर्वी शिवचरित्र हे अप्लिकेशन प्ले स्टोअर वर पब्लिश केलं.

हे अप्लिकेशन डाउनलोड केल्याबद्दल ना कसले पॉईंट्स तुम्हाला मिळतात, ना कसला रिचार्ज, ना पैसे, पण यांच्यामध्ये असलेले शिवरायांचे चरित्र, तुमचा पाठीचा कणा ताठ करायला प्रेरणा देते.

ना कसले प्रमोशन, ना पब्लिसिटी, ना कसले कॅम्पेन असे असताना बघता बघता आज अखेर एवढ्या छोट्याश्या कालावधीत 1 लाख डाऊनलोड्स पूर्ण झाले आहेत.
जे फक्त महाराष्ट्रातून आहेत.

अंकांच्याच भाषेत सांगायचे म्हटल्यावर
प्ले स्टोअर वर “shivaji maharaj” असे सर्च केल्यावर प्रथम क्रमांकावर आपले शिवचरित्र येते.

पाचशे पेक्षा जास्त लोकांनाडून पाचपैकी “4.9” अशी अप्लिकेशन ची रेटिंग आहे.

डाऊनलोड ची रोजची सरासरी 500 च्या आसपास आहे.

रोज सरासरी 2 ते 3 वाचकांकडून रेटिंग सबमिट होत आहे.

एक इतिहासप्रेमी म्हणून ही अचिव्हमेंट आमच्यासाठी खूप मोठी आहे.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या उपलब्धी मध्ये आपले मोलाचे सहकार्य आहे.
आपले प्रेम आणि पाठींबा असाच राहूदे.

भिडे गुरुजींच्या बदनामीचा डाव फसला, समोर आला खरा व्हिडीओ

संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक इथल्या भाषणामध्ये केलेल्या विधानाचा विपर्यास करून ते अर्धवटरित्या दाखवण्यात आले होते. भिडे गुरुजींचा खरा व्हिडीओ हा आता समोर आला असून या व्हिडीओमुळे ‘माझा आंबा खाल्ल्याने गर्भधारणा होते’ हे त्यांचे वाक्य मोडतोड करून सगळीकडे सादर करण्यात आल्याचं सिद्ध झालंय. भिडे गुरुजी नेमकं काय म्हणाले ते नीट ऐका

 

फर्जंद सिनेमा सर्वांनी अवश्य पहा.


कोंडाजी फर्जत यांनी पन्हाळा किल्ला हा फाल्गन कृ. ञयोदशी शके १५९५ रोजी, इ.स. मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जत यांनी अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. त्या वेळी पन्हाळा किल्ला हा अदिलशही च्या ताब्यात होता तेव्हा किल्ल्यावर बाबुखान नावाचा सुभेदार होता. कोंडाजींनी त्या बाबुखानास मारले व गड ताब्यात घेऊन गनिमी कावा या उद्ध तंञाचा अनोखा वापर केला होता. खरे तर पन्हाळा स्वरांज्यात नसल्याने कोकनात उतरणे अवघड होत होते. कोकनाच्या नेमक्या तोडांवर पन्हाळा होता. किल्ला बेलाग, अवघड, पावसाळ्यात शञु चाल करणे सोडाच पण विचार करणे ही अवघड होते असा पन्हाळा किल्ला हा अदिलशाही च्या ताब्यात होता.

तेव्हा गडा खाली कोंडाजींनी जे मावळे उभे केले होते त्यांच्या हाती पलीदे देऊन चकरा मारायला लावले. व कोंडाजी व निवडक ६० मावळे घेऊन गडावर गेले व घनघोर युद्ध सुरु झाले. कोंडाजी यांच्या तलवारीच्या घावात बाबुखान पडला, तो मारला गेला असता, कोंडाजी यांनी अनोखी युद्ध निती इथे आकली. गडाच्या खाली पलीदा देऊन उभे असलेल्या मावळ्यांच्या हाती पलीदे देऊन उभे केले होते ते मावळे आडीस्से च्या सुमारात होते. त्या मोहीमेत कोंडाजी यांच्या सोबत अन्नाजी दत्तो हे ही होते. अन्नाजी पंताना गडाखाली जंगलात मावळे घेऊन ठेवले होते. कोंडाजी अदिलशाही सैन्यास बोलले की गडाच्या खाली हजारो ची फौज आहे. शस्ञ टाका नाही तर जागच्या जागी मारले जाल. अदिलशाही फौजेने शस्ञ टाकले व शरन आले. व पन्हाळा स्वरांज्यात आला. इथे कोंडाजी फर्जत यांनी गनिमी काव्याने हजारो च्या संखेने असलेल्या अदिलशाही सैन्यावर विजय मीळवला.

या बद्दल अधिक काही गोष्टी सविस्तर जावुन घेऊयात.

कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं.
राजे,३०० गडी द्या फक्त
राजे अचंबित झाले
कोंडाजी फक्त ३००? पुरतील
कोंडाजी म्हणला
राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले. इथे माञ मोहीमेच्या आधीच कोंडाजी फर्जत यांना शिवाजी महाराजांनी सोन्याचे कडे इनाम म्हणुन दिले. असा उल्लेख साधनांमधे सापडतो.
कोंडाजीनी महाराजांना मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाले.
अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली. किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली,
गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात.
आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च , १६७३

कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपले. अनाजी दत्तो यांना सांगितलं,
पंत आपण हितचं थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या.
पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी निघाले. त्यानी सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले. अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले. पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा आणि त्यात कर्णे… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. किल्लेदारास वाटले इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला.
सोबत अनेकांना सांगू लागला “सैन्य खूप आहे…जीव वाचवा…पळा…गनीम संख्येने फार आहे.” हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.

मग काय? सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले. बघता बघता किल्ला घेतला गेला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती, तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला. गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले, तोफांना बत्त्या दिल्या. त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या. एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला.
*तो किल्ल्यावर गेला तो दिवस चैत्र शु प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा! राजांना बातमी कळली आणि मग काय विचारता, राजे भारावून बोलू लागले,*
तोफा द्या, साखर वाटा, सरनोबत आपल्या हुजुरातीची तयारी करा! आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे!
राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी व बाकी साथीदारांचे सत्कार कौतुक केले !
कोंडाजी आणि त्यांच्या ६० सहकाऱ्यांना मानाचा मुजरा !

!!जय शिवराय !!

अवघा‬ “मराठा छत्रपती” झाला!

#6 जून 1674 पाच सुलतानी सत्तेच्या छाताडावरती पाय देऊन माझा राजा छत्रपती झाला……
#फक्त जिजाऊंचा पुत्र शिवबा छत्रपती नाही झाला,
#तर इथल्या हिरव्या वादळाला नमवून भगवी🚩 दहशत निर्माण करणारा अवघा “मराठा छत्रपती” झाला!
‪#‎उत्सव मराठेशाहीचा‬
#उत्सव सार्वभौमत्वाचा‬
‪#‎शिवराज्याभिषेक सोहळा‬

तमाम मराठी बांधवांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शिवमय शुभेच्छा……
‪#‎जयोस्तु‬ मराठा🚩🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩
💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र !!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Farzand Movie Review: असा ‘फर्जंद’ पुन्हा होणे नाही

महाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आजही अनेकांच्या छाती इंचभर का होईना फुलतातच. एवढ्या वर्षांनंतरही जर महाराजांबद्दलची आत्मियता कमी झालेली नसली तर विचार करा की, शिवकालात काय वातावरण असेल? महाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.
आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरव गाथा ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. पण त्यांच्या एका शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या त्यांच्या शिलेदारांचा मात्र इतिहासात फारसा उल्लेख दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’ सिनेमाच्या माध्यमातून लिलया मांडली आहे.
अवघ्या साठ मावळ्यांनी अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली. कमी मनुष्यबळ आणि युद्धसामग्रीच्या बळावर शत्रूवर विजय मिळवून युद्ध जिंकल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना मानली जाते. दिग्पालने याच घटनेवर ‘फर्जंद’ हा सिनेमा साकारला आहे.
मराठी सिनेमांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. दिग्पाल आणि त्याच्या संपूर्ण टीमने मराठी सिनेसृष्टीत ‘फर्जंद’च्या निमित्ताने अजून एक साहसी प्रयोग केला असेच म्हणावे लागेल. ऐतिहासिक युद्धपट अशी या सिनेमाची ओळख म्हणता येईल. सिनेमात ६० ते ७० टक्के साहसी दृश्ये आहेत. शिवाजी महाराज यांची रणनीती, त्यांचा गनिमी कावा त्याचबरोबर मराठ्यांची शस्त्रे, युद्ध करण्याचे प्रकार याचेही दर्शन सिनेमातून उत्कृष्टरित्या दाखवण्यात आले आहे. मराठी सिनेमांना साहसी दृश्ये हाताळता येत नाही हे चित्र या सिनेमामुळे नक्कीच पुसले जाईल यात काही शंका नाही. काही दृश्यांमधील संकलन अजून चांगले होऊ शकले असते असे सिनेमा पाहताना नक्कीच वाटते.
या सिनेमाचा मुळ गाभा आहे तो व्हीएफक्स. एखाद्या सिनेमात ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते. त्या काळातील शहरे, वास्तू हुबेहूब साकारणे फार महत्त्वाचे असते. फर्जंदच्या टीमने व्हीएफक्सच्या माध्यमातून शिवकालीन जगच प्रेक्षकांसमोर उभं केलं आहे. रायगड किल्ल्याची बांधणी करतानाची दृश्यं या सिनेमात दाखवण्यात आली आहेत. मोठ्या पडद्यावर ते चित्र पाहताना नकळत आपण त्या काळात जातो, हे व्हीएफक्सच्या टीमचं खरं यश आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराज यांची भूमिका फार उत्तमरित्या साकारली आहे. पडद्यावर शिवाजी महाराजांचे आगमन होताना अनेकदा आपण ‘बाहुबली- २’ तर पाहत नाही आहोत ना याची आठवण होते. आजच्या तरुण पिढीला शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल फारसे माहित नाही. त्यांच्यासाठी ‘फर्जंद’ हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे. नवोदित अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारली आहे. अमराठी असूनही सिनेमामध्ये असलेला त्याचा वावर वाखाण्याजोगा आहे.
सिनेमाची लांबी जास्त असली तरी कोणत्याही क्षणी सिनेमा तुम्हाला कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाचा पुर्वार्ध जेवढा रंजक आहे तेवढाच उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीत खिळवून ठेवतो. या सिनेमात उत्कृष्ट कलाकारांची फौजच आहे. गणेश यादवने साकारलेले तानाजी मालुसरे ही भूमिका पाहिली तर फार लहान आहे. पण लहान भूमिकाही लोकांच्या लक्षात कशी रहावी याचं कसब त्याच्याकडे पुरेपुर आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओकची ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका त्याच्या कारकिर्दितील लक्षात राहतील अशा भूमिकांपैकी एक असेल यात काही वाद नाही. बहिर्जीच्या साथीदाराची भूमिका अभिनेता निखिल राऊत याने साकारली आहे. बहिर्जीप्रमाणेच तोही स्वराज्यासाठी हेरगिरीचे काम करत असतो. प्रसाद आणि निखिलने संपूर्ण सिनेमात पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. समीर धर्माधिकारीने साकारलेली बेशक खानची भूमिका लक्षात राहते. या सिनेमामुळे एक वेगळा समीर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
स्लो- मोशन, अॅक्शन सीन, पाश्वसंगीत, भारावून टाकणारं भाषण यामुळे ज्यापद्धतीने शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी लढतात ते पाहून अनेकदा आपल्या अंगावरही काटा येतो. पडद्यावरील तसेच पडद्यामागील प्रत्येक कलाकाराने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘फर्जंद’च्या टीमने पुन्हा एकदा दाखवून दिले.
सिनेमात अनेक कलाकार असूनही कोणताही कलाकार दुसऱ्यामुळे झाकोळला गेला नाही. सिनेमा संपताना जेवढा फर्जंद लक्षात राहतो तेवढी मृणाल कुलकर्णीने साकारलेली जिजाऊ, मृण्मयी देशपांडेने साकारलेली केसर आणि सिनेमातील प्रत्येक मावळा लक्षात राहतो. अंशुमन विचारेने साकारलेली ‘भिकाजी’ ही भूमिका अवघ्या काही मिनिटांची आहे पण तरीही त्या दोन मिनिटांचं त्यानं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. दिग्पाल लांजेरकरने उचललेलं हे शिवधनुष्य त्याने लिलया पेललं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे शिवाजी महाराज्यांच्या या ‘अनसंग हिरों’ची कामगिरी मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखी आहे.
-मधुरा नेरुरकर
साभार : लोकसत्ता